क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले : 194 वी जयंती विशेष

सावित्रीबाई फुले

पहिल्या भारतीय महिला शिक्षिका, आधुनिक स्त्रीवादी, कवयित्री

३ जानेवारी १८३१ हा क्रांतिज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. पहिल्या भारतीय महिला शिक्षिका, आधुनिक स्त्रीवादी, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ञ आणि कवयित्री म्हणुन सावित्रीबाई फुले यांची अनन्यसाधारण ओळख आहे. सावित्रीबाई फुले यांना भारतातील स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखले जाते.

सावित्रीबाईंनी पती महात्मा फुले यांच्या साथीने भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावली. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. तत्कालीन ब्रिटिश राजवटी मधील ही पहिली मुलींची शाळा ठरली.

३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. १० मार्च १९९८ रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले. २०१५ मध्ये, पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले.

सावित्रीबाई फुलेंचे प्रारंभिक जीवन, विवाह आणि शिक्षण

सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगांव (खंडाळा तालुका, सातारा जिल्हा) येथे झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. वडील खंडोजी पाटील हे गावचे पाटील होते. नेवसे-पाटील यांचे घराणे हे पेशवे काळातील इनामदार घराणे होते. त्यामुळे सावित्रीबाईंचे बालपण मोठे मजेत गेले. सावित्रीबाईंना कोणत्याही शाळेत पाठवण्याचा प्रश्नच नव्हता कारण त्या काळात वंचित आणि मागासवर्गीय मुलांना शाळेत शिकण्याचा अधिकार नव्हता.

महिला स्वातंत्र्य नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाई फुले यांचा विवाह १८४० मध्ये ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. बाल विवाहाची परंपरा असल्याने विवाहाच्या वेळी त्या नऊ वर्षांच्या होत्या. तर ज्योतिराव तेरा वर्षाचे होते. ज्योतिराव फुले हे आधुनिक विचारक आणि समाज सुधारक होते.

लग्नाच्या वेळी सावित्रीबाई निरक्षर होत्या. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना त्यांच्या घरीच प्राथमिक शिक्षण दिले. ज्योतिरावांकडे त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सावित्रीबाईंनी पुढील शिक्षण ज्योतीरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर यांच्याकडे पूर्ण केले.

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य

समाजात स्त्रियांचे स्थान, अधिकार यांचा दर्जा सुधारण्यासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांसह शिक्षणाच्या प्रसारासाठीही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. १ जानेवारी, १८४८ रोजी पुण्यामधील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ मनुवादी समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.

केवळ चार वर्षांत कोणत्याही खाजगी मदतीशिवाय १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या. या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत नऊ मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली.

सावित्रीबाईंची ही यशस्वी शाळा सनातनी उच्च वर्णीयांनी खुपत होती. मनुवादी सनातन्यांनी या शाळेला “धर्म बुडाला.. जग बुडणार.. कली आला..” असे सांगून पराकोटीचा विरोध केला. अनेक प्रकारे त्यांना त्रास दिला. हे महान कार्य करत असताना सावित्रीबाईंना संकटांचा सामना करावा लागला. लोकांनी त्यांच्या अंगावर शेण फेकले, दगड फेकून मारले, काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक प्रकारच्या संघर्षांचा सामना करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच ठेवला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.

सावित्रीबाई या आधुनिक स्त्रीवादी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी स्त्रियांच्या अधिकारांसाठी महान असे कार्य केले. त्या काळी समाजामध्ये स्त्रियांचे स्थान हे अतिशय खालावलेल्या दर्जाचे होते. स्त्रियांना विशेष असे कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते. समाजाच्या अतिशय जाचक आणि क्रूर रूढी परंपरांना स्त्रिया बळी पडत असत. स्त्रियांच्या अधिकारांसाठी, समाजाच्या जाचक रूढी परंपरांपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी सावित्रीबाईंनी काही क्रूर रूढींनाही आळा घातला.

बाल विवाह प्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाहाला अजिबात मान्यता नव्हती. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे नाहीतर त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा बिलकुलही अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.

जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे सांभाळले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल सावित्रीबाई फुले यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.

ब्राह्मण समाजातील स्त्रीविरोधी केशवपन प्रथा बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करुन त्यांचा संप घडवून आणला. विधवा स्त्रियांना पुनर्विवाह करता यावा यासाठी पुनर्विवाहाचा कायदा अस्तित्वात यावा म्हणून सावित्रीबाईंनी आटोकाट प्रयत्न केले.अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली.

सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाई फुले यांचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली.

१८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले.

१८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.

सावित्रीबाई फुले यांचे साहित्य

सावित्रीबाई फुले या लेखिका आणि कवयित्रीसुद्धा होत्या. त्यांनी १८५४ मध्ये काव्यफुले आणि १८९२ मध्ये बावनकाशी सुबोध रत्नाकर प्रकाशित केले आणि “जा, शिक्षण मिळवा” नावाची कविता देखील प्रकाशित केली, ज्यामध्ये त्यांनी वंचित लोकांना शिक्षण घेऊन स्वतःला मुक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले.

सावित्रीबाई फुले यांचा सन्मान

– सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ १० मार्च १९९८ रोजी भारतीय टपाल विभागाने टपाल तिकीट प्रसिद्ध केले.
सावित्रीबाई फुले

– २०१५ मध्ये, पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले.
सावित्रीबाई फुले

– ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः मुलींच्या शाळांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

FAQs

१) बालिकादिन केव्हा साजरा केला जातो?
– ३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिकादिन म्हणून साजरा केला जातो.

२) सावित्रीबाई फुले यांचा पाहिला कवितासंग्रह कोणता व केव्हा प्रकाशित झाला?
– सावित्रीबाई फुले यांचा पाहिला कवितासंग्रह ‘काव्यफुले’ १८५४ मध्ये प्रकाशित झाला.

३) सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा केव्हा सुरू केली?
– सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.

४) सावित्रीबाई फुले यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते?
– सावित्रीबाई फुले यांना ज्ञानज्योती, क्रांतिज्योती या टोपणनावाने ओळखले जाते.

५) सावित्रीबाई फुले यांनी १९४९ मध्ये पुण्यातील मुस्लिम महिलांना आणि लहान मुलांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने कोणाच्या घरी शाळा सुरू केली?
– सावित्रीबाई फुले यांनी १९४९ मध्ये पुण्यातील मुस्लिम महिलांना आणि लहान मुलांना शिक्षित करण्याच्या उस्मान शेख यांच्या घरी शाळा सुरू केली.

You Mau Also Like

1 thought on “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले : 194 वी जयंती विशेष”

Leave a Comment