“माझ्या अमेरिकेच्या बहिणी आणि बंधूंनो…”, या शब्दांनी भाषण सुरु करून संपूर्ण १९८३ च्या जागतिक धर्म परिषदेचे लक्ष वेधून घेणाऱ्या, जगाला हिंदू धर्माची ओळख करून देणाऱ्या व संकल्पना समजावून सांगणाऱ्या अशा नरेंद्र नाथ दत्त अर्थात स्वामी विवेकानंद यांची १२ जानेवारी ही जयंती. स्वामी विवेकानंदानी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा परिचय करून देण्यात प्रमुख भूमिका निभावली. हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे काम स्वामी विवेकानंदानी केले. स्वामी विवेकानंदांना भारतातील हिंदू सुधारणा चळवळींचे प्रमुख म्हणून ओळखले जाते. त्यांनी ब्रिटिशशासित भारतात राष्ट्रवाद आणण्यात योगदान दिले.
स्वामी विवेकानंदांचे प्रारंभिक जीवन
स्वामी विवेकानंदांचा जन्म कोलकत्ता मधील सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३ रोजी3 झाला. त्यांचे बालपणीचे नाव नरेंद्र नाथ दत्त असे होते. स्वामी विवेकानंदांचे वडील विश्वनाथ दत्त हे कोलकत्ता उच्च न्यायालयात ॲटर्नी ( वकील) होते. विश्वनाथ दत्त यांचा साहित्य,धर्म,तत्त्वज्ञान इत्यादी विषयांशी संबंध होता. स्वामी विवेकानंदांच्या मातोश्री भुवनेश्वरी दत्त यादेखील धार्मिक होत्या. आई वडील धार्मिक असल्याने घरातील वातावरण हे धार्मिक होते. त्यामुळे स्वामी विवेकानंदांवर देखील धार्मिक संस्कार झाले.
स्वामी विवेकानंद यांना संगीतात विशेष रस असल्याने त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले होते. शारीरिक सुदृढतेकडेही त्यांचे लक्ष असे. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवत गीता इत्यादी धार्मिक साहित्यात त्यांना आवड होती. व्यायाम, लाठी चालवणे, पोहणे, कुस्ती, घोडे स्वारी या सर्व क्षेत्रात स्वामी विवेकानंद पारंगत होते. अंधश्रद्धा जातीव्यवस्था, धर्माध प्रथा यांच्या विरोधात त्यांचे प्रश्न नेहमी उपस्थित असत. त्यांची वाचनाची गती अफाट होती.
स्वामी विवेकानंद यांचे प्राथमिक शिक्षण ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशन मध्ये झाले.१८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन, प्रेसिडेन्सी कॉलेजला प्रवेश घेतला.त्यानंतर त्यांनी जनरल असेम्ब्लिज इन्स्टिट्यूशन मध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र,युरोपचा इतिहास,पाश्चात्य तत्त्वज्ञान इत्यादी विषय हाताळले. १८८१ मध्ये ते फाईन आर्टची परीक्षा उत्तीर्ण झाले. १८८४ मध्ये बीए शिक्षण त्यांनी पूर्ण केले.
स्वामी विवेकानंद यांनी एम्यनुल कान्ट, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल,ऑगस्ट कॉम्ट,आर्थर शोपनहायर,डेव्हिड ह्युम,हर्बट स्पेन्सर,जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इत्यादी पाश्चात्य विचारवंतांचा अभ्यास केला होता. पाश्चात्य तत्त्वज्ञान अभ्यासताना त्यांनी प्राचीन संस्कृत साहित्य आणि बंगाली ग्रंथाचाही अभ्यास केला.
स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांची भेट
स्वामी विवेकानंद हे अलौकिक ज्ञानी होते. सर्व प्रकारच्या ज्ञानाने व्यापलेले होते. त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचीही ओढ होती. विवेकानंद काही काळ ब्रह्मा समाजाचे नेते महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर यांच्या संपर्कात होते. एकदा महर्षी देवेंद्रनाथांना स्वामी विवेकानंद यांनी विचारले,” तुम्ही देव पाहिला आहे का?” विवेकानंदांच्या प्रश्नाने महर्षी देवेंद्रनाथ आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंस यांची भेट घेण्यास सांगितले.एके दिवशी त्यांचे शेजारी सुरेंद्रनाथ यांच्याकडेच रामकृष्ण परमहंसांची भेट झाली.
रामकृष्ण परमहंस त्यांना जवळ बसवून अनेक उपदेश करत. ते दोघेच असतांना त्यांची आपापसांत खूप चर्चा होत असे. रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंदांना इतके प्रवृत्त केले की,त्यांनी आपल्या गुरु बद्दलची भक्तीची खोल भावना विकसित केली. रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव विवेकानंदांवर पडला आणि रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य बनले.
रामकृष्ण परमहंस यांच्या सहवासात राहिल्याने त्यांच्या विचारात बदल घडवून आले. आपल्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भार ते नरेंद्रनाथांवर सोपवणार होते. रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना लोकशिक्षणाचे कार्य सोपवले. रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरण `स्वामी विवेकानंद’ असे केले.
रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन ची स्थापना
श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले एक गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात रामकृष्ण मठाची स्थापना केली. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी १ मे १८९७ केली. त्याचे मुख्यालय कोलकाता मधील बेलूर या ठिकाणी आहे.
वेदांत तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी या मिशनची स्थापना करण्यात आली. विवेकानंदानी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशनने समाजसुधारणा व समाजसेवेचेही व्रत हाती घेतले. त्यांनी औषधालय, दवाखाने, विद्यालय ह्या क्षेत्रात कार्य केले आणि राष्ट्रीय संकटात मदत केली . दुष्काळ, पूर, भूकंप इ. नैसर्गिक आपत्तींच्या वेळी मदत व पुनर्वसनाचे मानवतावादी कार्य रामकृष्ण मिशनने केले.
स्वामी विवेकानंदांचा प्रवास
स्वामी विवेकानंद यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षी भगवी कपडे परिधान करून आपला भारतभर प्रवास सुरू केला. त्यांनी आपल्या पाच वर्षाच्या प्रवासात विविध शिक्षण केंद्रांना भेटी दिल्या. विविध धार्मिक परंपरा आणि सामाजिक नमुन्यांची ओळख करून दिली. त्यांनी लोकांच्या दुःखाबद्दल आणि गरिबी बद्दल सहानुभूती निर्माण केली आणि राष्ट्राच्या उन्नतीचा संकल्प केला. विवेकानंदांनी आपला प्रवास कधी पायी तर कधी रेल्वेने असा केला. प्रवासादरम्यान ते सर्व जाती धर्मातील लोकांना भेटले, त्यांच्यासोबत राहिले. आपल्या प्रवासात जोडलेल्या अनेक लोकांना त्यांनी जाणून घेतले. विवेकानंदांनी आपला प्रवासातील वेळ गोरगरिबांच्या झोपड्या आणि सम्राटांच्या राजवाड्यांमध्ये घालवला. यावेळी त्यांनी जातीय पूर्वग्रहांसह सामाजिक विकृती जाणून घेतल्या आणि त्या दूर करण्यासाठी प्रयत्नही केले.
स्वामी विवेकानंदांनी भारताप्रमाणे जगभरही प्रवास केला. स्वामी विवकानंद हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी चीनला गेले. परंतु त्यांनी तेथे आपला धर्म मोठा आणि चांगला दाखविण्याचा प्रयत्न केला नाही.तेथे मानवतेप्रती विश्वधर्म समरसता आणि अध्यातमाची भावना व्यक्त केली.
स्वामी विवेकानंदांच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे आणि त्यांच्या विद्धवत्तेमुळे अमेरिकेतील अनेक लोक त्यांच्या भजनी लागले. अमेरिकेत विवेकानंदांनी आपल्या जवळच्या शिष्यांना वेदांताची शिकवण पसरविता यावी म्हणून त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आपल्या शिक्षणाचा प्रसार करता यावा म्हणून त्यांनी अमेरिकेत छोटी केंद्र सुरू केली. विवेकानंदांच्या चाहत्यांनी अमेरिकेत त्यांची अनेक व्याख्याने घडवून आणले. अमेरिकेतील दोन वर्षाच्या वास्तव्यात त्यांनी हिंदू धर्माचा महान संदेश तेथील लोकांपर्यत पोहोचविला.
त्यानंतर ते इंग्लंडला गेले. तेथेही त्यांनी आपल्या विचारांनी लोकांना प्रभावित केले. इंग्लंडमध्ये त्यांना अनेक अनुयायी मिळाले. आपल्या शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी इंग्लंडमध्ये त्यांनी छोटी केंद्र सुरू केले. इंग्लंडमध्ये त्यांचे अनुयायी असलेल्या कु.मार्गारेट नोबेल या त्यांच्या शिष्या बनल्या. पुढे त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला व त्या भगिनी निवेदिता म्हणून प्रसिध्दीस आल्या. पुढे भगिनी निवेदिता यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतासाठी समर्पित केले.
१८९३ च्या शिकागो सर्वधर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व
सप्टेंबर १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो या शहरात जागतिक सर्वधर्म परिषद भरवली होती. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले. संपूर्ण जगातून सर्व धर्माचे मान्यवर पंडित या परिषदेला उपस्थित होते. ११ सप्टेंबर १८९३ रोजी या परिषदेत बोलण्याची स्वामी विवेकानंदांना मिळाली. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी “माझ्या अमेरिकेच्या बहिणी आणि बंधूंनो…” अशी करुन त्यांनी तेथील उपस्थित श्रोत्यांच्या हृदयाला हात घातला.
आपल्या ओघवत्या शैलीत त्यांनी हिंदू धर्माची श्रेष्ठता व उदात्तता सर्वांना पटवून दिली. हिंदू धर्माची बाजू अतिशय प्रभावीपणे मांडली. त्यांनी जगातील सर्व धर्मामध्ये एकतेचा मुद्दा मांडला. या जागतिक धर्म परिषदे मधील त्यांच्या तत्वज्ञानाने ते लोकप्रिय व्यक्तिमत्व बनले.
स्वामी विवेकानंदांचे तत्वज्ञान
माणूस आयुष्यभर शिकतच असतो. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर काही ना काही ज्ञान त्याला मिळत असते वा ते तो प्राप्त करत असतो. अनेकदा आपल्याला मिळणारे ज्ञान, माहिती वा शिक्षण उथळ असू शकते. स्वामी विवेकानंदांनी खऱ्या शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले आहे.
केवळ घोकमपट्टी म्हणजे शिक्षण नाही. शिक्षणाने मानवी शक्तींचा, व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला पाहिजे. आपण चारित्र्यसंपन्न बनले पाहिजे, समंजसपणा आला पाहिजे, नकारात्मकता दूर झाली पाहिजे. शिक्षण तेव्हाच सार्थकी लागते, जेव्हा विपरीत, प्रतिकूल परिस्थितींमध्ये त्याचा उपयोग करून समस्येतून बाहेर पडता येते. आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ कुटुंबाला नाही तर, समाजाला, देशाला, देशहितासाठी झाला पाहिजे. असे शिक्षण उपयोगी पडते.
प्रत्येक जीव हा मूळ रूपातच ईश्वरी आहे. अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे. कर्म किंवा पूजा किंवा मानसिक नियंत्रण किंवा तत्त्वज्ञान यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करून मुक्ति मिळवली पाहिजे.
मृत्यू
विवेकानंदांनी अत्यंत कमी वयात अध्यात्मिक शिखर गाठाले होते. मानसिक आणि आत्मिक दिशेनं गती झाल्यामुळे त्यांचे शारीरिक स्वास्थ्य मात्र खालावले होते. ४ जुलै १९०२ रोजी त्यांनी समाधी घेतली . ते अवघे ३९ वर्षांचे आयुष्य जगले. एव्हढ्या कमी काळात त्यांनी केलेले अफाट धार्मिक कार्य येणाऱ्या पिढ्यांच्या सदैव लक्षात राहील. कन्याकुमारी येथे विवेकानंदांचे स्मारक आपल्याला प्रेरणा देत उभे आहे.
राष्ट्रीय युवा दिन
विवेकानंदांचा जन्म दिन १२ जानेवारी, भारतीय युवा शक्तीला धर्म, देश आणि अध्यात्माच्या उदांत दिशांमध्ये नेण्यासाठी त्यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय युवा दीन साजरा केला जातो.
विवेकानंद यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. भारतात राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याची सुरुवात १९८५ मध्ये झाली. विवेकानंद हे केवळ भारतातच नव्हे तर जगभर त्यांच्या विचार आणि आदर्श साठी प्रसिध्द होते.
हे पण वाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले : 194 वी जयंती विशेष
1 thought on “स्वामी विवेकानंदांची 161 वी जयंती : राष्ट्रीय युवा दिवस”